दूधगंगा पाणी योजनेतील त्रुटींवर प्रशासन मौन का? नागरिक संतप्त, जबाबदारांवर गंभीर आरोप

Spread the love

अब्दुललाट / प्रतिनिधी 

अब्दुल लाट गावातील नागरिकांनी दूधगंगा नदी उगम पाणी योजनेतील गंभीर त्रुटींविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केलेले आंदोलन अद्यापही निष्फळ ठरत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. वारंवार ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.या पार्श्वभूमीवर 16 मार्च रोजी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. यावेळी पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील लोहार यांनी 19 मार्च 2026 पर्यंत योजनेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत लेखी माहिती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत कोणताही अहवाल किंवा कृती आराखडा सादर करण्यात आलेला नाही.यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “कारवाई न करण्यामागे कोणाचा दबाव आहे का?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच भ्रष्ट ठेकेदार व त्याच्या निकटवर्तीयांचा हस्तक्षेप असल्याचीही चर्चा जोर धरत आहे.ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास गावकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासारखे असल्याची टीका होत आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तात्काळ खुलासा करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केली आहे.अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!