नानक साई फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार सुनील कांबळे यांना प्रदान

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

नानक साई फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या वेळी सन्मान करण्यात आला. दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष आणि मार्गदर्शक मा. श्री. सुनील कांबळे (बापू) यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध समाजसेविका तृप्ती देसाई, साई संस्थानचे गोरक्ष गाडविलकर तसेच शिर्डी नगरपालिकेच्या महापौर सौ. जयश्री थोरात उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते श्री. सुनील कांबळे यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, समाजातील प्रश्नांवर केलेले प्रभावी लेखन आणि जनतेशी असलेले नाते याबद्दल विशेष कौतुक केले.कार्यक्रमात दैनिक मराठवाडा नेतेचे संस्थापक मुख्य संपादक प्रा. रामेश्वर बहादूर यांची व शिख गुरुद्वाराचे सदस्य यांची उपस्थिती लाभली. तसेच नानक साई फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना तृप्ती देसाई यांनी समाजकार्यातील पारदर्शकता आणि जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. “समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांमुळे नवी ऊर्जा मिळते,” असे त्या म्हणाल्या. महापौर जयश्री थोरात यांनीही शहर विकासात सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले.पुरस्कार स्वीकारताना श्री. सुनील कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची बाब असून, यामुळे समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळते.” त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!