पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एमआयडीसी परिसरात कमल ट्रेडर्स या ऑईल डेपोला लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली होती. मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर एक्सेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कमल ट्रेडर्स या दुकानाला रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील कामगार आणि नागरिकांनी, शेजारील दुकानदार तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुकानामध्ये मशीन शॉपसाठी लागणारे कटिंग ऑईल, इंजिन ऑईल तसेच इतर ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले .आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळासाठी नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील मशीनसाठी लागणारे साहित्य आणि इतर उपकरणे पूर्णतः जळून खाक झाली. यामुळे व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः ज्वलनशील पदार्थ साठवणाऱ्या दुकानदारांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.