जयसिंगपूरात शनिवारी ‘महामानवांची गौरवगाथा’ प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

जयसिंगपूर येथे येत्या शनिवारी (दि. २८ मार्च) एक प्रेरणादायी सांस्कृतिक मेजवानी रंगणार असून ‘महामानवांची गौरवगाथा’ या संगीतमय प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सहकारमहर्षी स्व.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात सायंकाळी ठीक ४ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर,महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच आण्णाभाऊ साठे या महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यांच्या विचारधारेवर आधारित गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.‘विश्वरत्न’ प्रस्तुत आणि कुणाल कांबळे निर्मित या कार्यक्रमात नामांकित गायक-कलाकारांचा सहभाग असणार आहे.यामध्ये गायक शुभम कांबळे, शीतल देसाई, विनायक कांबळे, शाहीर रफिक पटेल, विनायक लोखंडे, प्रदीपराज कांबळे तसेच गायिका काजल तोडकर हे आपल्या सुरेल आवाजातून उपस्थितांना प्रेरणादायी गीतांची मेजवानी देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन स्वप्नील पन्हाळकर करणार असून वाद्यसंगतीसाठी संग्राम कांबळे, ऋतिक कुरणे, अमीर नदाफ, रमजान बालेखान, गणेश देसाई आणि पंचशील कांबळे यांची साथ लाभणार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. विशेषतः युवकांमध्ये सामाजिक भान आणि प्रेरणा निर्माण व्हावी,यासाठी अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक उपक्रमांची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.भीमवंदना कलामंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संयोजक कुणाल कांबळे,शुभम सुभाष कांबळे,राहुल गुडिमणी,पुलकेश कांबळे,दीपक महानाम,भीमराव शिरटीकर आणि प्रशांत कांबळे (कुरुंदवाड) यांनी शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.जयसिंगपूर परिसरात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक वातावरणात हा सोहळा रंगणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!