शिरोळ / प्रतिनिधी
शहरातील नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चोरपावलाने सुरुवात केल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुश संघटनेने केला असून, या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय साठमारी आणि जनतेची फसवणूक असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे.नगरपरिषद निवडणुकीच्या अगोदर तब्बल ९० दिवस आंदोलन करून शहराला नेमके काय मिळाले, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “ठेकेदार बदला” या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.मात्र आता त्याच ठेकेदाराकडून पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. जर तोच ठेकेदार योग्य होता, तर नऊ महिने काम बंद ठेवून शहराचे मोठे नुकसान का केले, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.योजनेतील तांत्रिक बाबींवरही संघटनेने गंभीर आक्षेप घेतले आहेत.अशुद्ध पाण्याची लाईन तब्बल २५ ठिकाणी वळवून आणण्यात आल्याने फिल्टर हाऊसला अपेक्षित प्रमाणात पाणी मिळणार नाही, असा दावा करण्यात आला. परिणामी, ही योजना पूर्ण झाली तरी नागरिकांना एक दिवसाआडच पाणी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.तसेच, अंतर्गत पाईपलाईनसाठी वापरण्यात आलेल्या पाईप्सचा दर्जा हलका असल्याने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होणार नाही, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण योजना अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची ठरणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.एकूणच,राजकीय साठमारीत अडकलेली ही तिसरी पाणी योजना देखील अपयशी ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत असून, शिरोळकरांना स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी आणखी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार का, असा संतप्त सवाल संघटनेने केला आहे.दरम्यान,या सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.