पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाचा फटका आता स्थानिक स्तरावर बसू लागला आहे. इंधन टंचाईच्या भीतीपोटी मंगळवार दुपारपासून पुलाची शिरोली सांगली फाटा परिसरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी प्रचंड गर्दी केली. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि सीएनजीचा पुरवठा बंद झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.पुलाची शिरोली परिसरातील बहुतांश पंपांवरील इंधन संपल्याने केवळ सांगली फाटा येथील ‘कोरगांवकर पेट्रोल पंपा’वर इंधन उपलब्ध होते. परिणामी, दुपारपासूनच या ठिकाणी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या गर्दीचा थेट परिणाम राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर झाला. सांगली रोडवर हालोंडी गावाच्या पुढे आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाढती वाहतूक कोंडी आणि वाहनधारकांमधील तणाव पाहता स्थानिक शिरोली पोलीस आणि हायवे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे, मात्र वाहनांची संख्या इतकी प्रचंड आहे की वाहतूक नियंत्रणात आणताना पोलिसांची मोठी दमछाक होत आहे.एकीकडे इंधन संपल्याचे फलक पेट्रोल पंपांवर लागल्याने आणि दुसरीकडे महामार्गावर अडकून पडल्याने परगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. शिरोली परिसरातील सर्वच पंपांवरील इंधन एकाच वेळी संपण्यामागे नेमके तांत्रिक कारण आहे की पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.