शिरोळ / प्रतिनिधी
“बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, राम कृष्ण हरी…” या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शिरोळ येथून चैत्र वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे रविवारी सकाळी उत्साहात प्रस्थान झाले. संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले असून वारकऱ्यांच्या या पवित्र सोहळ्याने शिरोळ नगरीत आध्यात्मिक उर्जा संचारली.चैत्र वारीच्या निमित्ताने गेल्या अकरा वर्षांपासून शिरोळ येथील उद्योजक ह.भ.प. हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे, अनिल इंगळे, सुनील इंगळे व त्यांच्या परिवाराच्या वतीने स्वखर्चातून या पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. यंदाही ही परंपरा जपत शेकडो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून दिंडी प्रस्थान सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.दिंडी प्रस्थानापूर्वी सकाळी ह.भ.प. दादासाहेब इंगळे यांच्या निवासस्थानी विणा पूजन, पालखी पूजन आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला. ह.भ.प. राजाराम महाराज व ह.भ.प. महेश कळेकर (सर) यांच्या हस्ते हा धार्मिक विधी संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालखीचे पूजन करून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.दिंडीने शहरातील विविध मंदिरांना भेट देत आपला प्रवास सुरू केला. श्री हनुमान मंदिर (गावडे गल्ली), श्री ब्रह्म मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर, चौकातील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर येथे आरती करण्यात आली. प्रत्येक मंदिरात वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या निनादात वातावरण भारावून गेले होते.दिंडी मार्गावर शिरोळकरांनी सडा टाकून, सुंदर रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करून वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले. नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून “हरी विठ्ठल”च्या जयघोषात दिंडीला निरोप दिला. या स्वागताने वारकऱ्यांचा उत्साह दुणावला आणि भक्तिभाव अधिकच वृद्धिंगत झाला.दिंडी प्रस्थानावेळी संजय उर्फ संभाजी चव्हाण, पत्रकार चंद्रकांत भाट, नगरसेवक ओंकार गावडे, पंचगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप उर्फ बाबा पाटील, किरण गावडे, सर्जेराव कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत या पवित्र यात्रेसाठी मंगलकामना व्यक्त केल्या.या दिंडी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन ह.भ.प. हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे, सुनील इंगळे, अनिल इंगळे, गुरुप्रसाद इंगळे, दिगंबर इंगळे, धैर्यशील इंगळे व इंगळे परिवारातील सदस्यांनी केले आहे. त्याचबरोबर किरण ताराप-माने, सर्जेराव माने, विलासराव गावडे, संपत जाधव, अशोक इंगळे, अमरसिंह जगदाळे, शंकर गावडे, भरत रोडे, तानाजी माने, संग्राम माने, आप्पासाहेब हंकारे आणि प्रगतशील शेतकरी हैबतराव जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.दिंडीतील वारकरी टाळ, मृदुंग, भगव्या पताका आणि विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. “पंढरीनाथ महाराज की जय”, “ज्ञानदेव तुकाराम” या जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते.वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि भक्तिभाव हा या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरला.प्रत्येक दिवशी दिंडीच्या मुक्कामस्थळी कीर्तन व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्या माध्यमातून अध्यात्मिक मार्गदर्शन मिळणार असल्याने या यात्रेला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.गेल्या अकरा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या दिंडी सोहळ्यामुळे इंगळे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजसेवा आणि भक्ती यांचा सुंदर संगम साधत त्यांनी वारकरी परंपरेचा वारसा जपला आहे.त्यांच्या या कार्यामुळे शिरोळ परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेची भावना अधिक दृढ होत आहे.चैत्र वारीच्या या पवित्र सोहळ्यामुळे शिरोळ नगरीत भक्ती,श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून “हरी विठ्ठल”च्या गजरात पंढरपूरकडे निघालेली ही दिंडी भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.