शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ व परिसरातील मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी केली.शनिवारी सकाळी शिरोळ येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.पवित्र वातावरणात नमाज अदा करताना जागतिक शांतता, देशाची एकता व अखंडता तसेच समाजातील जातीय सलोखा कायम राहावा यासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले.नमाज पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला.यावेळी शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षण सभापती शरद मोरे, आरोग्य सभापती विजय आरगे, नगरसेवक ओंकार गावडे, दीपक भाट, उल्हास आवळे, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी नगरसेवक पंडित काळे, विठ्ठल पाटील, पद्मसिंह पाटील, अभिजित गुरव, बबन पुजारी आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या.रमजान ईद हा मुस्लिम समाजातील सर्वात मोठा सण मानला जातो. महिनाभर उपवास (रोजा) केल्यानंतर हा सण साजरा केला जातो.या दिवशी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्याची परंपरा आहे. यंदाही हाफिज अमीरोद्दीन,हाफिज इलियास, हाफिज खुबेब तसेच मुफ्ती मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले व विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन समस्त शिरोळ मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरोळ पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाजानंतर शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने ईदगाह मैदानावर उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.एकात्मता,बंधुभाव आणि शांततेचा संदेश देणारा हा सण शिरोळमध्ये अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.