शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषद येथे असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स, शिरोळ यांची एक महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दि.२० मार्च रोजी सकाळी १० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.शहराच्या विकासाशी निगडित बांधकाम परवाना प्रक्रिया तसेच विविध घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट करत प्रधानमंत्री आवास योजना (BLC), व्याज अनुदान योजना (ISS), भागीदारी तत्वातील परवडणारी घरे (AHP) तसेच रमाई आवास योजना यांची सविस्तर माहिती दिली.या योजनांचा लाभ समाजातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यानंतर गुंठेवारी विकास नियमितीकरण, बांधकाम परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अतिक्रमणधारकांसाठी परवानगी,शेतघर बांधकाम परवाना, कबुलायत जमीनधारकांसाठी प्रक्रिया तसेच गावठाण हद्दवाढ क्षेत्रातील बांधकाम परवान्याबाबत सखोल माहिती देण्यात आली.या सर्व प्रक्रियांमध्ये पारदर्शकता व सुलभता आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी “एक खिडकी योजना कक्ष” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला.या कक्षामार्फत बांधकाम परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांची ऑफलाइन तपासणी करून त्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून, प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.तसेच BPMS सॉफ्टवेअरच्या वापराबाबत अभियंते व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्याचे नियोजनही जाहीर करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनिक कामकाज अधिक परिणामकारक करण्यावर यावेळी भर देण्यात आला.गरीब व गरजू नागरिकांना घरकुल योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सर्व मान्यवरांनी दिली.शहरातील प्रत्येक पात्र नागरिकाला निवारा मिळावा, यासाठी सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. बैठकीनंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक व सदस्यांनी विविध मुद्द्यांवर आपले प्रश्न व सूचना मांडल्या. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,बांधकाम सभापती अनिता संकपाळ,नगरसेवक राहुल कोळी, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,रचना सहायक सचिन गाडेकर,प्रशासकीय अधिकारी तुकाराम पाटील,CLTC अभिषेक कोळी तसेच शिराळा येथील CLTC मुनीर लंगरदार यांनी सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत सकारात्मक चर्चा घडवून आणली.असोसिएशनचे अध्यक्ष नितीन शेट्टी,संचालक विनोद मुळीक व अजय पाटील यांनी अशी महत्वपूर्ण बैठक आयोजित केल्याबद्दल नगरपरिषदेचे आभार मानले.या बैठकीमुळे प्रशासन व तांत्रिक तज्ञ यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल आणि शिरोळ शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ही बैठक प्रथमच आयोजित करण्यात आल्यामुळे सर्वच स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.नगरपरिषदेमध्ये लोकशाही मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी अशा बैठका भविष्यातही नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.रचना सहायक सचिन गाडेकर, CLTC अभिषेक कोळी व मुनीर लंगरदार यांनी तांत्रिक मार्गदर्शन करताना विविध योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले.त्यांच्या सूचनांमुळे उपस्थितांना योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.समारोपाच्या भाषणात नगराध्यक्षा योगिता कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी सर्वांच्या सहकार्याने शहराचा विकास साध्य होईल,असा विश्वास व्यक्त केला. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचा निर्धार व्यक्त करत,घरकुल योजनांद्वारे गरीब नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.एकंदरीत,या बैठकीमुळे शिरोळ शहरातील विकासकामांना गती मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, प्रशासन व तांत्रिक क्षेत्रातील समन्वयातून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.