जि.प. शाळा स्मार्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना अधिक सक्षम व आधुनिक बनवण्यासाठी त्या ‘स्मार्ट शाळा’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना शाळांच्या भौतिक सुविधाही तितक्याच सक्षम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिरोळ येथील राजाराम विद्यालय क्र. २ मध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीराजसिंह यादव बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. अनुराधा गुरव, नगरसेविका सौ. सुवर्णा कांबळे, सौ. रेखा कोरे, सौ. सविता पुजारी, तसेच नगरसेवक दीपक भाट आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक सनी सुतार यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माहिती दिली.महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. उपनगराध्यक्ष यादव पुढे म्हणाले, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत असून, या शाळा टिकवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. डिजिटल साधनसामग्री, ई-लर्निंग सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन शाळांना आधुनिक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून सहकार्य दिले जाईल,असे त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमात राजाराम विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अभिजीत माने, उपाध्यक्ष सचिन देशमुख आणि सल्लागार सदस्य सुरज मोरे यांचा सत्कार करण्यात आला.स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटिका आणि देशभक्तीपर सादरीकरणांना उपस्थित पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती जाधव, उपाध्यक्षा सौ. प्राजक्ता इंगळे, तसेच सदस्य, शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शाळेच्या शिक्षकांनी केले. शेवटी चंद्रकांत भाट यांनी उपस्थितांचे आभार मानले.एकूणच, या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!