पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील सांगली फाटा नजीक असणाऱ्या रद्दी च्या गोडाऊनला मंगळवारी पहाटे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे प्रदीपकुमार अँड कंपनी नावाने संदीप घोरपडे व प्रदीप घोरपडे यांचे रद्दीचे गोडावून आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागदी रद्दीचा साठा होता.मंगळवारी पहाटे दोन च्या सुमारास या रद्दीच्या गोडावूनला अचानक आग लागली.सगळीकडे कागदी रद्दीचा साठा असल्याने बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.तसेच याठिकाणी असणारा मालवाहू टेम्पो जळून खाक झाला आहे. घटनास्थळी कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका,वडगाव नगरपरिषदच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.गाड्या येईपर्यंत कंपनीत असणाऱ्या अग्निशमन रोधक यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पहाटे चारच्या सुमारास अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश आले. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता वर्तविली आहे.घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.मंगळवारी सकाळी गावकामगार तलाठी महेश सुर्यवंशी,कोतवाल संदीप पुजारी यांनी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे.