अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर कॉ.आप्पा पाटील यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

Spread the love

अब्दुल लाट / प्रतिनिधी 

अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीवरील पाणीपुरवठा योजनेतील कथित गैरप्रकार, बेकायदेशीर हस्तांतरण आणि ग्रामस्थांना होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात कॉम्रेड आप्पा पाटील यांनी आज सकाळपासून सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. अब्दुल लाट गावातील पाणीपुरवठा योजनेबाबत गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत असून जॅकवेलकडे जाणाऱ्या रस्त्याची खरेदी, योजनेचे कथित बेकायदेशीर हस्तांतरण तसेच गावातील अनेक भागात अत्यंत कमी दाबाने व अनियमित पद्धतीने होत असलेला पाणीपुरवठा या गंभीर मुद्द्यांवर वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत, ठेकेदार व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या संदर्भात दोन वेळा ‘चाय पे चर्चा’ देखील आयोजित करण्यात आली होती; मात्र त्यातून कोणताही ठोस निर्णय निघाला नाही.या पार्श्वभूमीवर कॉ.आप्पा पाटील यांनी आज सकाळपासून आमरण उपोषण सुरू करून ग्रामपंचायत व प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडले.आंदोलनाची दखल घेत शिरोळ पंचायत समितीचे नूतन सभापती मिलिंद कुरणे,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता लोहार,सरपंच सौ.कस्तुरी कुरुंदवाडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी महालिंग अकिवाटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.र्चेनंतर प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या रास्त असल्याचे मान्य केले.तसेच पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करून संबंधित सर्व बाबींची पूर्तता ३० एप्रिल २०२६ पूर्वी करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.या लेखी आश्वासनानंतर कॉ. आप्पा पाटील यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा केली.दरम्यान,आजच्या आंदोलनात सुरेश शेडबाळे, आ.क.कुरुंदवाडे,जयश्री पाटील, विद्याधर कुलकर्णी, सतीश कुरणे, प्रशांत आवळे, देवेंद्र कांबळे, शांतिनाथ मगदूम, संजय पाटील, दादा सांगावे, दादा पाटील, दादा कोळी, संदीप बोदगे, महावीर गाडवे, अविनाश कोळेकर, प्रवीण गवाराई, भगवान सलगर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनामुळे अब्दुल लाट येथील पाणीपुरवठा योजनेतील अनियमिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामस्थांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!