श्री भैरेश्वर मूर्ती वज्रलेप सोहळ्यासाठी लोकवर्गणीचा शुभारंभ

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरटी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर श्री भैरेश्वर देवाच्या मूर्तीचा वज्रलेप महापेहरावा, महायज्ञ व महाप्रसाद सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने श्री भैरेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटी शिरटी यांच्या वतीने मंदिर परिसरात नियोजन बैठक पार पडली.या बैठकीत धार्मिक सोहळ्यासाठी लोकवर्गणी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.बैठकीत श्री भैरेश्वर देवाच्या मूर्तीचा वज्रलेप करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिराच्या प्राचीन परंपरेला जपत मूर्तीची देखभाल व संवर्धन करण्याच्या दृष्टीने वज्रलेप करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यानंतर सर्वांच्या एकमताने मूर्तीचा वज्रलेप करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या धार्मिक सोहळ्यादरम्यान महापेहरावा, महायज्ञ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.या सर्व धार्मिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गावातील भाविक भक्तांकडून लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.देवस्थानाच्या कार्यात गावकऱ्यांचा आणि भक्तांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने जास्तीत जास्त भाविकांनी देणगी स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.ज्या भाविकांना या धार्मिक कार्यासाठी देणगी द्यायची आहे त्यांनी संतोष गुरव,सचिन खोबरे आणि महावीर पाटील (बंडू) यांच्याशी संपर्क साधावा,असेही समितीच्या वतीने सांगण्यात आले.दरम्यान, मंदिराच्या जीर्णोद्धारासह होणारा हा धार्मिक सोहळा गावाच्या श्रद्धा,परंपरा आणि एकोप्याचे प्रतीक ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवक वर्ग,मान्यवर आणि भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदवण्याचे ठरविले.या बैठकीस धनाजी भोसले, बाळासो पाटील, अभय गुरव, संतोष पाटील, बाळासो बंडगर, रुद्राक्ष कांबळे, विपुल कोगनोळे, भरत पाटील, स्वप्निल पाटील, अनिल रोजे, राजगोंडा पाटील, अण्णासो सुतार, राजकुमार ढेकळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक वर्ग आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!