अब्दुल लाट / प्रतिनिधी
दूधगंगा उगम पाणीपुरवठा योजनेतील कथित त्रुटी आणि कामातील अनियमिततेविरोधात गावकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत असून या प्रश्नावर कॉम्रेड आप्पा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून या पाणीपुरवठा योजनेतील अडचणींबाबत कॉम्रेड पाटील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.नळ कनेक्शनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमादरम्यान संबंधित ठेकेदारांना नागरिकांसमोर उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली होती.मात्र त्यावेळी ठेकेदारांनी येण्यास नकार दिला.परंतु आता ते पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले.पण ग्रामस्थांसमोर येण्यास टाळाटाळ करणारे ठेकेदार अधिकाऱ्यांसमोर कसे हजर झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या योजनेतील त्रुटींवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व संबंधितांची बैठक घेण्याची मागणीही करण्यात आली होती.मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.प्रशासन गावकऱ्यांच्या प्रश्नांपासून का दूर पळत आहे, असा थेट प्रश्न कॉम्रेड पाटील यांनी उपस्थित केला.सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दूधगंगा उगम पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असतानाही अनेक नळ कनेक्शनधारकांना नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर याला जबाबदार कोण,असा सवाल उपस्थित करत कॉम्रेड आप्पा पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदारांना धारेवर धरले.पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी तातडीने दूर करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी लढा द्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.