गोकुळच्या ६३ व्या वर्धापनदिनी ‘गोकुळ आईस्क्रीम’चे लोकार्पण; दूध संकलन २५ लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चा ६३ वा वर्धापन दिन गोकुळ प्रकल्प, शिरगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या विशेष कार्यक्रमात ‘गोकुळ आईस्क्रीम’ या नव्या उत्पादनाचे लोकार्पण करण्यात आले.तसेच ‘गोकुळश्री’ स्पर्धा व विविध बक्षीस वितरण कार्यक्रमही पार पडले. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री ना. हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आ.सतेज (बंटी) पाटील, आ. चंद्रदीप नरके यांच्यासह गोकुळचे संचालक मंडळ, दूध उत्पादक,विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी गोकुळच्या सहकार चळवळीतील योगदानाचा गौरव केला. स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी १६ मार्च १९६३ रोजी सहकाराच्या माध्यमातून लावलेले छोटेसे रोप आज मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. गोकुळने दूध संकलनापुरते कार्य मर्यादित न ठेवता विविध दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतही उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचेही त्यांनी सांगितले.गेल्या काही वर्षांत गोकुळ संघाच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय वाढ झाली आहे. संघाच्या ठेवी ३२० कोटी रुपयांवरून ६०४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्या असून दूध संकलनही सुमारे २० लाख लिटरपर्यंत पोहोचले आहे. येत्या काळात हे संकलन २५ लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दूध उत्पादकांच्या हितासाठी संघामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘नारी सन्मान योजना’ अंतर्गत महिला दूध उत्पादकांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येत आहे. तसेच पॅरामेट्रिक विमा योजनेंतर्गत तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास प्रति जनावर प्रतिदिन ५०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.याशिवाय गोकुळमार्फत एआय आधारित आधुनिक गोठा प्रणाली,वैरण बँक योजना तसेच नेदरलँड्समधील तज्ज्ञांच्या माध्यमातून दूध उत्पादक व पशुवैद्यकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वितरक आणि ग्राहक यांच्या विश्वासामुळेच गोकुळची प्रगती शक्य झाली असल्याचे सांगत भविष्यातही सहकाराच्या बळावर गोकुळला देशातील अग्रगण्य दूध संघ बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!