१ लाख ५१ हजार १५१ रुपयांची पहिल्या सवालासाठी बोली; भैरेश्वर मंदिरावर होणार हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील शिरटी गावातील जागृत देवस्थान आणि ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे ऐतिहासिक श्री भैरेश्वर मंदिर सध्या भक्तांच्या उत्साहाने आणि धार्मिक वातावरणाने न्हाऊन निघाले आहे.मंदिराचे बांधकाम, रंगकाम आणि सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर या वर्षीच्या यात्रेनिमित्त अनेक आकर्षक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यात्रेच्या मुख्य दिवशी, सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी पालखी प्रदक्षिणेवेळी श्री भैरेश्वर मंदिरावर तसेच पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती जाहीर होताच भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.यावर्षीची भैरेश्वर यात्रा अधिक भव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी युवक यात्रा कमिटीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामानंतर प्रथमच असा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात येत असल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यात्रेच्या दिवशी केवळ शिरटी गावावरच नव्हे तर तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त देवस्थान मंदिरावर देखील हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.या ऐतिहासिक पुष्पवृष्टी कार्यक्रमासाठी प्रमुख सहा सवाल काढण्यात आले. हे सवाल शिरटी गावातील ग्रामस्थ, शेतकरी, भैरेश्वर भक्त आणि भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले. संगीतकार सचिन चौगुले यांच्या संगीतमय कार्यक्रमाच्या वातावरणात या सवालांचा कार्यक्रम रंगला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात सवालासाठी बोली लावण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. पहिल्या क्रमांकाच्या सौधर्म यजमान सवालाचे मानकरी म्हणून श्री उल्हास पारिसा चौगुले यांची निवड झाली. त्यांनी तब्बल १ लाख ५१ हजार १५१ रुपयांची बोली लावत हा सवाल जिंकला. या सवालानुसार त्यांना पुणे येथून शिरटीकडे येण्याचा मान मिळणार आहे. हा मान गावातील प्रतिष्ठेचा मान समजला जात असल्याने यासाठी मोठ्या उत्साहाने बोली लावण्यात आली. सहाव्या क्रमांकाच्या इंद्रध्वज सवालाचे मानकरी श्री महादेव दादू माळी ठरले. या सवालानुसार त्यांना भैरेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी करून पुण्याकडे जाण्याचा मान मिळाला आहे. हा देखील अत्यंत मानाचा सवाल मानला जातो.दुसऱ्या क्रमांकाच्या धनपती कुबेर सवालासाठी श्री अशोक आप्पासो चौगुले यांनी १ लाख १५ हजार ११५ रुपयांची बोली लावून हा सवाल जिंकला.तिसऱ्या क्रमांकाच्या ईशान इंद्र सवालासाठी सौ.शारदा सिद्धप्पा घालवाडे या महिला मानकरी ठरल्या. त्यांनी या सवालासाठी १ लाख १ हजार १११ रुपयांची बोली लावली. चौथ्या क्रमांकाच्या कल्पेंद्र सवालासाठी सौ. रुपाली सुहास राजमाने यांनी १ लाख ११ हजार १११ रुपयांची बोली लावत मान मिळवला. तर पाचव्या क्रमांकाच्या कामदेव सवालासाठी सौ. विमल मिरजे या मानकरी ठरल्या. त्यांनी या सवालासाठी १ लाख १ हजार १११ रुपयांची बोली लावली.सवालाचा कार्यक्रम सुरू असताना सभागृहात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. Lगावातील अनेक भाविक,ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाने यात्रेचा उत्साह अधिक वाढला.दरम्यान, यात्रेच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रवीण रावसो गतारे आणि संदीप बापू मगदूम यांनी यात्रेतील आहारदानासाठी १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी यात्रा कमिटीकडे सुपूर्द केली. त्यांच्या या उदार देणगीबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी श्री भैरेश्वर मंदिरातील मानकऱ्यांचा तसेच मंदिरात नवरात्र उत्सवाच्या काळात उपवासाला बसणाऱ्या भक्तांचा यात्रा कमिटीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.धार्मिक परंपरा जपणाऱ्या या भक्तांचा सत्कार केल्याने कार्यक्रमाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.यात्रेतील हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीचा अनुभव अधिकाधिक भाविकांना मिळावा यासाठी यात्रा कमिटीने एक विशेष लकी ड्रॉ योजना देखील जाहीर केली आहे. या योजनेनुसार जे भाविक १ हजार १०० रुपयांची देणगी देऊन अधिकृत पावती घेतील, अशा भक्तांमधून तीन भाग्यवान भक्तांच्या कुटुंबांची निवड करण्यात येणार आहे. या भाग्यवान कुटुंबांना हेलिकॉप्टरमधून श्री भैरेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याचा मान मिळणार आहे.या लकी ड्रॉ योजनेमुळे अनेक भाविकांना आयुष्यात एकदा तरी असा अनोखा धार्मिक अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.भैरेश्वर मंदिराच्या उर्वरित सुशोभीकरणासाठी तसेच मंदिराच्या विकासकामांसाठी निधी उभारण्याचा उद्देशही या योजनेमागे आहे. त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी या योजनेत सहभागी होऊन मंदिराच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री भैरेश्वर बांधकाम, कलशारोहण, सुशोभीकरण व युवक यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला भैरेश्वर युवक यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रमोद उदगावे, उपाध्यक्ष शिवम लंबे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी, उपसरपंच प्रकाश माळी, सतीश चौगुले, अशोक चौगुले, अनिल रोजे, विनोद मगदूम, राजकुमार शिरगावे, निखिल पाटील, रविराज पाटील, संदीप रोजे, कुलदीपक बनीजवाडे, अमित शिरगावे, संदीप चौगुले, प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, प्रकाश उदगावे, रावसाहेब मगदूम, ओंकार चौगुले, शीतल पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह श्री भैरेश्वर बांधकाम, कलशारोहण, सुशोभीकरण व युवक यात्रा कमिटीचे पदाधिकारी तसेच शिरटी गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भैरेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा हेलिकॉप्टर सवालाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. आगामी यात्रेच्या दिवशी होणाऱ्या हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीच्या सोहळ्याकडे आता सर्व भाविकांचे लक्ष लागले असून हा सोहळा भैरेश्वर भक्तांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!