शिरोळ / प्रतिनिधी
म्हैसाळ बंधाऱ्याच्या कामामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला असून कनवाड बंधारा साइटवर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन आजपासून अधिक तीव्र करण्यात आले आहे.ठेकेदाराच्या चुकीमुळे वाहून गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा तसेच धरणाच्या कामासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचा न्याय्य दराने मोबदला मिळावा, या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.पाटबंधारे विभागाने परवा घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून मोबदला दिला जाईल असे सांगितले.मात्र लाखो रुपयांच्या जमिनीचे नुकसान झाले असताना केवळ हजारो रुपयांचा मोबदला देण्याचा प्रयत्न होत असल्याने हा शेतकऱ्यांची सरळसरळ फसवणूक असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. हा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, आजपासून शेतकऱ्यांनी बंधारा साइटवर मंडप उभारून आंदोलन अधिक तीव्र केले असून काम पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.धरणाच्या कामांमध्ये आणि पोच रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत तसेच धरणाच्या मागील बाजूस असलेल्या आणि भविष्यात पाण्याखाली जाणाऱ्या शेतजमिनींचे मालक अशा सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. आमच्यावर झालेल्या अन्यायाचे निराकरण तातडीने न झाल्यास येत्या काळात धरणाच्या पाण्यात सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी शासनाला दिला.या आंदोलनात आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,वाजिदअल्ली इनामदार,संभाजी जाधव,मोहम्मद इनामदार, अमर खाडे, इर्शाद इनामदार,सत्तार पाटील, मंगेश नलावडे, खालीद इनामदार यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनावर आता मोठा दबाव निर्माण झाला आहे.