पुणे-बेंगलोर महामार्गावर नागाव फाटा येथे अवजड ट्रेलर पुलात घुसला; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाटा परिसरात शुक्रवारी उशिरा रात्री अवजड मालवाहू ट्रेलर पुलाच्या बांधकामात घुसल्याची घटना घडली. या अपघातात ट्रेलरचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास नागाव फाटा येथील हॉटेल हिंदूला समोरील पुलाजवळ घडला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेलर मुंबईहून मोठ्या आकाराचे इलेक्ट्रिकल कॉईल घेऊन बेंगलोरच्या दिशेने निघाला होता. प्रवासादरम्यान चालकाने नागाव फाटा परिसरात थांबा घेतला. हॉटेल हिंदूलाशेजारी असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी चालकाने ट्रेलर रस्त्याच्या कडेला उभा केला. त्यावेळी ट्रेलरला हँडब्रेक लावून चालक खाली उतरला होता.मात्र काही क्षणातच ट्रेलरचा हँडब्रेक निसटल्यामुळे अवजड वाहन हळूहळू उताराच्या दिशेने पुढे सरकू लागले. काही सेकंदातच ट्रेलर जवळपास दोन फूट पुढे जाऊन थेट पुलाच्या बांधकामात जोरदार धडकला. या धडकेत ट्रेलरचा ऑक्सेल बार तुटला आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे वाकला असून वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेत सुदैवाची बाब म्हणजे अपघात घडत असताना ट्रेलरचा क्लिनर केबिनमध्ये झोपलेला होता. पुलावर धडक बसल्यानंतरही त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. चालकही वाहनाबाहेर असल्यामुळे तोही सुखरूप बचावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.अपघाताची वेळ रात्री उशिराची असल्यामुळे त्या वेळी महामार्गावरील वाहतूक तुलनेने कमी होती. त्यामुळे इतर वाहनांना या अपघाताचा फटका बसला नाही. मात्र जर हा अपघात गर्दीच्या वेळेत झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती.सध्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिक – ठिकाणी उड्डाणपुलांचे बांधकाम तसेच रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागाव फाटा परिसरात वाहतुकीचा ताण वाढलेला असून वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. या अपघातामुळेही काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. तसेच अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करण्यासाठी यंत्रणेला पाचारण करण्यात आले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.या घटनेमुळे महामार्गावर वाहन उभे करताना चालकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेषतः उताराच्या ठिकाणी वाहन उभे करताना हँडब्रेकची व्यवस्थित लागला आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. या अपघाताने पुन्हा एकदा महामार्ग सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!