सर्वसामान्य कुटुंबातील प्राची पाटीलची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी झेप; BDS पदवी संपादनाबद्दल सर्वत्र कौतुक

Spread the love

Lशिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सदस्य चिमासाहेब उर्फ सी.जी.पाटील यांची कन्या व प्रफुल उर्फ डपलू पाटील यांची पुतणी डॉक्टर कुमारी प्राची अरुणा चिमासाहेब पाटील हिने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत दंतचिकित्सक (BDS) ही पदवी मुंबई येथील गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज (GDC) मधून यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत असून विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.प्राची पाटील ही सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत कठोर परिश्रम,चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविण्यात यशस्वी ठरली आहे.विद्यार्थीदशेत तिने अत्यंत जिद्दीने आणि एकाग्रतेने शिक्षण पूर्ण करत दंतचिकित्सक ही पदवी संपादन केली. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील प्रतिष्ठित गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमधून BDS पदवी मिळवणे ही तिच्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.प्राचीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह शिरोळ परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तिचे वडील चिमासाहेब उर्फ सी.जी.पाटील हे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी मुलीला लहानपणापासून शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. कुटुंबाच्या पाठबळामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे प्राचीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत हे यश संपादन केले आहे. प्राची पाटील हिच्या या यशाबद्दल सामाजिक,राजकीय, शैक्षणिक,व्यावसायिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.अनेकांनी तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत ती भविष्यात आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची सेवा करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.सर्वसामान्य कुटुंबातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून अथक परिश्रमांच्या बळावर यश संपादन करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण प्राची पाटील हिने घालून दिले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळत असून तिच्या कर्तृत्वाचा सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!