दूधगंगा उगम पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींवरून संताप; “आता आरपारची लढाई” – कॉम्रेड आप्पा पाटील यांचा इशारा

Spread the love

अब्दुल लाट / प्रतिनिधी 

अब्दुल लाट दूधगंगा नदी उगम पाणीपुरवठा योजनेत कथितपणे चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामकाजाविरोधात गावकऱ्यांचा आवाज अधिक तीव्र होत असून या प्रकरणावर कॉम्रेड आप्पा पाटील यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना काळ माफ करणार नाही,असा इशारा देत त्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.कॉम्रेड पाटील म्हणाले की,या योजनेच्या ठेकेदारांना नळ कनेक्शन धारकांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमादरम्यान आग्रहाने विनंती करण्यात आली होती.मात्र त्यावेळी मला येण्याची गरज नाही असे सांगणारे तथाकथित ठेकेदार आता पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले आहेत.त्यावेळी नागरिकांसमोर येण्यास नकार देणारे ठेकेदार आता अधिकाऱ्यांसमोर का हजर झाले? यामागचे नेमके कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.पाणीपुरवठा योजनेतील अडचणींबाबत गावासमोर ग्रामपंचायत कार्यालयात सर्व संबंधितांची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.गावकऱ्यांच्या प्रश्नांपासून प्रशासन का दूर पळत आहे?असा थेट प्रश्नही कॉम्रेड पाटील यांनी उपस्थित केला.सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र गैरसोय सहन करावी लागत आहे.दूधगंगा उगम पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असूनही अनेक नळ कनेक्शन धारकांना नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांत तीव्र असंतोष आहे.ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर याला जबाबदार कोण? असा सवाल करत कॉम्रेड आप्पा पाटील यांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांना धारेवर धरले.तसेच एरव्ही विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणारे आणि केवळ बघ्याची भूमिका घेणारे लोक आता तरी विचार करणार का,असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी गावकऱ्यांना एकजूट होण्याचे आवाहन केले.पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी तातडीने दूर करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा,अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देत कॉम्रेड आप्पा पाटील यांनी गावकऱ्यांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!