पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. या धोकादायक वळणावर गुरुवारी पहाटे तिन वाजण्यासुमार स्विफ्ट डिझायर कार सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की टनाचे बॅरिकेट १० फूट लांब सरकून कार बॅरिकेडवरच आडकुन पडली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, गाडीतील प्रवासी जखमी झाला आहे . विशेष म्हणजे, हा अपघात गुरूवारी पहाटे तिन वाजता घडला याबाबत शिरोली पोलिसांकडे अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, याच ठिकाणी मागील महिन्यात एका दुचाकीस्वाराचा असाच अपघात झाला होता, ज्यामध्ये दुचाकी बॅरिकेडवर अडकली होती. आता कारचाही तसाच अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या संतगतीने सुरू आहे, मात्र या कामामुळे सामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघातास कारणीभूत ठरणारे प्रमुख मुद्दे म्हणजे वळणापूर्वी प्रवाशांना सावध करण्यासाठी दिशादर्शक कोणतेही फलक लावलेले नाहीत. हायवेवर वाहनांचा वेग प्रचंड असतो, परंतु या वळणावर वेग मर्यादित करण्यासाठी ‘रंबल स्ट्रिप्स’ किंवा ‘स्पीड ब्रेकर’ नाहीत. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्या चालकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने गाड्या थेट बॅरिकेड्सवर जाऊन आदळत आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्ते कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसताना वाहतूक सुरू ठेवल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांना नेमके जबाबदार कोण? प्रशासन आणखी मोठ्या जीवितहानीची वाट पाहत आहे का? असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत. या धोकादायक वळणावर तातडीने दिशादर्शक फलक आणि वेगनियंत्रक उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी आणि शिरोली ग्रामस्थांकडून होत आहे.