शिरोळ / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेला शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामातही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.कारखान्याने हंगामात गाळपासाठी उपलब्ध झालेल्या संपूर्ण उसाची बिले एकरकमी व कोणतीही कपात न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत.यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.त्यांनी सांगितले की, चालू गळीत हंगामात कारखान्याने एकूण 11 लाख 78 हजार 705 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या उसापासून 12.35 टक्के साखर उतारा मिळाला असून कारखान्याने 12 लाख 85 हजार 970 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कमी कालावधीत अधिक गाळप करून कारखान्याने कार्यक्षमतेचे उदाहरण घालून दिले आहे.केंद्र शासनाच्या एफआरपी धोरणानुसार या हंगामासाठी उसाला प्रतिटन 3,378 रुपये दर देय होता.मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कारखाना व्यवस्थापनाने प्रतिटन 3,450 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हंगामात गाळपास आलेल्या 11,78,705 मेट्रिक टन उसासाठी एकूण 406 कोटी 65 लाख 32 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या हंगामातील उसाची देय असलेली संपूर्ण रक्कम 100 टक्के अदा करण्यात आली असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची ऊस शेती अधिक किफायतशीर व्हावी यासाठी कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजनेंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. सुधारित वाण,आधुनिक लागवड पद्धती, पाणी व्यवस्थापन, तांत्रिक मार्गदर्शन आदींच्या माध्यमातून सहभागी क्षेत्रातील एकरी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. या योजनांमुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, तसेच आगामी गळीत हंगामासाठी जास्तीत जास्त उसाची नोंद कारखान्याकडे द्यावी,असे आवाहनही गणपतराव पाटील यांनी यावेळी केले.या पत्रकार परिषदेला कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील,व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सर्व संचालक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.शेतकऱ्यांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने ऊस बिले देण्याची परंपरा कारखान्याने कायम ठेवली असल्यामुळे सहकार क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.