शिरोळ नगरपरिषद मार्फत घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांचे आश्वासन

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला घरकुल मेळावा बुधवारी (दि.११ मार्च) उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडला.या मेळाव्यात नागरिकांना घरकुल योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.शहरातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील,असे आश्वासन उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिले.या मेळाव्यास मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,नगरसेवक,नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगररचना विभाग प्रमुख सचिन गाडेकर यांनी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे स्वागत केले.यावेळी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी प्रास्ताविक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरोळ नगरपरिषद हद्दीतील लाभार्थ्यांची माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजना १.० अंतर्गत आतापर्यंत १५४ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असून प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत १०६ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे.तसेच काही तांत्रिक त्रुटींमुळे ११ घरकुल प्रकरणे नामंजूर करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.अपूर्ण घरकुल बांधकाम असलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक त्या सूचना आणि नोटीस देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी १३ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेश प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.तसेच कबुलायत जमिनीवर राहणारे नागरिक तसेच स्वतःची जागा नसलेल्या पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ कशा प्रकारे मिळू शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांबाबत २०१९ च्या शासन निर्णयानुसार आवश्यक अटी व शर्तींच्या अधीन राहून अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.यानंतर उपस्थित नागरिकांच्या घरकुल संदर्भातील विविध शंकांचे निरसन नगररचना विभाग प्रमुख सचिन गाडेकर, प्रधानमंत्री आवास योजना शहरस्तर तांत्रिक तज्ञ अभिषेक कोळी तसेच जिल्हा समन्वयक अशोक कोरे यांनी केले. घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष मदतही करण्यात आली.तसेच शंका विचारणाऱ्या नागरिकांची नावे,शंका व संपर्क क्रमांक नोंदवून घेण्यात आले.या घरकुल मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिरोळ नगरपरिषदेमार्फत शहरातील पात्र नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी पुढील काळातही असे उपक्रम राबविण्यात येतील,असे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!