शिरोळ पंचायत समिती सभापती पदी मिलिंद कुरणे, उपसभापती पदी सौ मनीषा कदम बिनविरोध

Spread the love

राजर्षी शाहू विकास आघाडीचे वर्चस्व कायम

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ पंचायत समितीच्या सभापतीपदी मिलिंद कुरणे तर उपसभापतीपदी मनीषा कदम यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.निवड जाहीर होताच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.शिरोळ तालुक्यातील १४ पंचायत समिती जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने दमदार कामगिरी करत १४ पैकी १० जागांवर विजय मिळवला.तर विरोधी गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पंचायत समितीवर राजर्षी शाहू विकास आघाडीचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले आहे.पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी आघाडीकडून अब्दुललाट मतदारसंघाचे सदस्य मिलिंद कुरणे यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपसभापती पदासाठी शिरढोण मतदारसंघाच्या सदस्य मनीषा कदम यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. दोन्ही पदांसाठी इतर कोणताही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर बोलताना नूतन सभापती मिलिंद कुरणे म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील–यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात विकासाची गती वाढली आहे.ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा,पाणीपुरवठा,रस्ते तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.उपसभापती मनीषा कदम यांनीही शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तालुक्यातील सर्व गावांचा समतोल विकास करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.या निवडीच्या प्रसंगी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील – यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, प्रमोददादा पाटील,माजी जिल्हा परिषद सभापती स्वाती सासणे,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी सभापती मल्लाप्पा खोत,भवानीसिंह घोरपडे, माजी सभापती सत्येंद्रराजे नाईक – निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, उत्तरा शिंदे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.निवड जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.तसेच नूतन सभापती आणि उपसभापती यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!