राहुरी येथे स्व.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील महिला फाउंडेशन बीजबँकेचा गौरव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६’ तसेच ‘जागतिक महिला दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शेडशाळ (ता. शिरोळ) येथील स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील महिला फाउंडेशनच्या बीजबँकेचा सन्मान करण्यात आला.स्थानिक देशी बियाण्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.या वेळी बीजमाता शमशादबी पठाण व वैशाली संकपाळ यांनी सन्मान स्वीकारला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन, चेन्नई यांच्या अध्यक्षा तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन, पुणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ञ कृषी व्यवसाय व्यवस्थापन अधिकारी सौ. उज्वला बानखिले, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या वरिष्ठ फेलो डॉ. आर. व्ही. भवानी तसेच भारतीय वन सेवेच्या अधिकारी व उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात बीजबँकेच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत देशी बियाण्यांचे जतन, संवर्धन आणि शेतकऱ्यांपर्यंत त्याचे वितरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक मान्यवरांनी केले. या उपक्रमामुळे पारंपरिक शेती पद्धती जपण्यास मदत होत असून पर्यावरणपूरक आणि टिकाऊ शेतीला चालना मिळत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.बीजबँकेच्या कार्यात शर्मिला केरीपाळे, आक्काताई मगदूम, शेवंती चौगुले यांच्यासह अनेक महिला सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच दत्त साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांचीही उपस्थिती होती.या चळवळीला श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बळ मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे देशी बियाण्यांचे महत्त्व, त्यांचे पर्यावरणीय व आर्थिक फायदे याबाबत महिलांमध्ये जनजागृती झाली आहे. त्यांच्या प्रेरणेनेच बीज बँकेचे कार्य आज अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे.सध्या या बीजबँकेत विविध पिकांचे शंभरहून अधिक देशी वाण सुरक्षितरीत्या जतन करण्यात आले असून राज्यभरातून मागणीनुसार हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. महिलांच्या पुढाकारातून उभारलेली ही बीज बँक पारंपरिक शेती संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

Leave a Comment

error: Content is protected !!