शिवशक्ती मंडळाच्या महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील शिवशक्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील श्रीराम सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन श्रीमती काशीबाई रामराव शिंदे (माई) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. लतादेवी माने होत्या.यावेळी नगराध्यक्ष सौ. योगिता कांबळे,महिला व बालकल्याण सभापती सौ.कल्पना काळे,उपसभापती सौ.अनुराधा गुरव,नगरसेवक सचिन शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या आरोग्य तपासणी शिबिरात महिलांसाठी विविध महत्त्वाच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या.यामध्ये हिमोग्लोबिन, थायरॉईड,कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन बी-३ आदींची तपासणी करण्यात आली.ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.तपासणीदरम्यान वैद्यकीय तज्ञांनी महिलांना आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन व औषधोपचाराबाबत सल्ला दिला.या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश जाधव यांच्यासह शहरातील डॉ.पायल माने,डॉ. सुशांत पाटील,डॉ.शुभांगी सुतार,डॉ. अंगराज माने यांनी उपस्थित राहून महिलांची आरोग्य तपासणी केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांना विविध आरोग्य समस्यांबाबत माहिती मिळाली तसेच योग्य उपचारांसाठी पुढील दिशा मिळाली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतीक्षा जगदाळे आणि इंद्रायणी जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेत नियोजन केले. शिवशक्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.

Leave a Comment

error: Content is protected !!