शिरोळ नगरपरिषदेतर्फे घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा उद्या

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी बुधवारी दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता लाभार्थ्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात घरकुल लाभार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्या, प्रलंबित कामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांवर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव आणि बांधकाम सभापती सौ. अनिता संकपाळ यांनी दिली.शिरोळ शहरातील अनेक नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळविताना विविध प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून पुढाकार घेत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विशेषतः कबूलायत जमीन (वर्ग–२) असलेल्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक निर्णय घेणे, अतिक्रमण असलेल्या जागांचे नियमन करून पात्र लाभार्थ्यांना योजना देणे, तसेच ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही अशा गरजू कुटुंबांना नियम व अटींच्या अधीन राहून जागा उपलब्ध करून देण्याबाबत या मेळाव्यात चर्चा होणार आहे. याशिवाय अपूर्ण राहिलेल्या घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा, घरकुल अर्जांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, तसेच गावठाण हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नागरिकांनाही घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे.नगरपरिषदेच्या वतीने लाभार्थ्यांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्यामुळे या मेळाव्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच या कार्यक्रमात घरकुल योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या काही लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात येणार आहे.शहरातील घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तसेच आधीच अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या अडचणी मांडण्यासाठी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव आणि बांधकाम सभापती सौ. अनिता संकपाळ यांनी केले आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!