महिला दिनानिमित्त शिरोळ नगरपरिषदेतर्फे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन देणे व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने गुरुवार दि. १२ व शुक्रवार दि. १३ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, महिला व बालकल्याण सभापती सौ. कल्पना काळे व उपसभापती सौ. अनुराधा गुरव यांनी दिली.या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या मोटारसायकल रॅलीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री मंगल कार्यालय, घालवाड रोड येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत. तसेच रक्त, लघवी, क्ष-किरण व कार्डिओग्राम तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांच्या आरोग्य विमा कवचाचे कार्डही देण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता प्रा. वैशाली जाधव (कसबा बावडा) यांचे “कळी उमलताना” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून निसर्गमित्र कोल्हापूरचे अनिल चौगुले “माझे घनकचरा नव्हे, धन कचरा व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनातील विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.सायंकाळी ४ वाजता महिला गृहउद्योग व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गृहउद्योग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सांगलीचे डॉ. कैलास पाटील, शासकीय योजना व माहिती केंद्राच्या संचालिका सुनीता पाटील, एमएसएमईचे विजय पवार, दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत जाधव, जिल्हा संसाधन विभागाचे अनिल केरीपाळे, फेडरल बँकेचे शाखा अधिकारी महेश निकम आणि सेंट्रल बँकेचे शाखा अधिकारी तेजावत वेंकटेश हे मार्गदर्शन करणार आहेत.शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता टारे क्लब हाऊस, अर्जुनवाड रोड येथे महिला बचत गट स्टॉलचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता जल प्रदूषण, पर्यावरण संवर्धन व जागृत स्त्री शक्ती या विषयांवर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता कडधान्यांपासून पौष्टिक पदार्थ बनवण्याची पाककला स्पर्धा होणार आहे. सकाळी ११ वाजता महिला संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.दुपारी १२ वाजता एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे घेणे व एका मिनिटात लांबलचक उखाणे घेणे या स्पर्धा होणार आहेत. दुपारी ३ वाजता “एक मिनिट” स्पर्धा होणार असून सायंकाळी ४ वाजता “जोडी तुझी माझी” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने वीर माता व वीर पत्नींचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून शिरोळमधील कर्तृत्ववान महिलांना “शौर्यवर्धिनी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या सर्व कार्यक्रमांमध्ये शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, महिला व बालकल्याण सभापती सौ. कल्पना काळे व उपसभापती सौ. अनुराधा गुरव यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!