देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा मोर्चा; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्ह्यातील देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात काढण्यात आला त्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील देवस्थान जमीन कसणारे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.देवस्थान इनाम जमिनीवर अनेक वर्षांपासून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जमीन कसूनही अनेक शेतकऱ्यांची नावे अद्याप सातबाऱ्यावर नोंदलेली नाहीत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर यांच्या निदर्शनास अनेक मागण्या आणून देण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे मालक सदरी करण्यासाठी कायदा करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच या विषयावर अंतिम मसुदा तयार करण्यापूर्वी किसान सभेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून बैठकीची वेळ लवकरात लवकर निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.देवस्थान इनाम जमिनीच्या अधिकार अभिलेखात कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्णपणे समाविष्ट करावीत तसेच त्यांच्या वारसांचीही नोंद करावी, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नूल परिसरात देवस्थान जमिनीवर शेती करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची नावे चुकीच्या पद्धतीने सातबाऱ्यावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ती नावे पुन्हा पूर्ववत समाविष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.मागील दोन वर्षांपासून अनेक ठिकाणी खंड भरून घेण्यात आलेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ खंड भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सातबाऱ्यावर चुकीच्या पद्धतीने करवीर पीठ या ट्रस्टचे नाव लावण्यात आले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ही नोंद रद्द करून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे मालक सदरी लावावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.चंदगड तालुक्यातील देवकवाडी येथील जमिनीच्या मालकी कोष्टकातून वैजनाथ देव इनामदार आणि श्री वैजनाथ देव वहिवाटदार ही नावे कमी करून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करावीत तसेच त्यांच्या वारसांची नोंद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे उपसमितीने जबरदस्तीने देवस्थान जमिनीवरील सुमारे १० ते १२ एकर पिकांचे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.काही ठिकाणी स्थानिक उपसमित्या आणि ग्रामस्थांकडून देवस्थानच्या पिकाऊ जमिनीचा वापर क्रीडांगण, सार्वजनिक हॉल किंवा इतर कामांसाठी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र या जमिनीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने देवस्थान जमिनी इतर कोणत्याही कारणासाठी देऊ नयेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.देवस्थान समितीने दिलेल्या आश्वासनानुसार सर्व खंडकरी शेतकऱ्यांचा खंड भरून घेण्यासाठी नियमावली तयार करून प्रक्रिया सुरू करावी. शेतामध्ये घर, गोठा, विहीर किंवा बोअरवेल केलेल्या शेतकऱ्यांकडून भूई भाडे भरून घेऊन त्यांना नियमित करण्यात यावे तसेच कडेलोट करणाऱ्या अटी रद्द कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.याशिवाय सर्व देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नागपूर ते रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या देवस्थान जमिनीचा योग्य मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची ‘फार्मर आयडी’साठी नोंदणी करण्यात यावी तसेच प्रधानमंत्री किसान योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. पूर, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.पर्यावरणाचा विचार करून तसेच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शक्तीपीठ महामार्गासारखे शेती उद्ध्वस्त करणारे प्रकल्प तात्काळ रद्द करावेत, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.या आंदोलनाला डॉ. उदय नारकर, प्राचार्य डी. बी. पाटील, उमेश देशमुख, कॉ. शिवाजी मगदूम, ॲड. दशरथ ढवळी, प्रा. आबासाहेब चोगले, ॲड. अमोल नाईक, नारायण गायकवाड, संग्राम सावंत, गुलाब मुल्लानी, रमेश पाटील, आप्पा परिट, दिनकर आडमापूर, रामभाऊ कंवळेकर, विकास पाटील, युवराज भोसले यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांचे समर्थन लाभले असून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Comment

error: Content is protected !!