शिरोळ / प्रतिनिधी
शिरटी गावचे ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचे बांधकाम, रंगकाम व सुशोभिकरणाची कामे पूर्ण झाली असून १३ एप्रिल २०२६ रोजी भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेनिमित्त मुख्य दिवशी पालखी प्रदक्षिणेदरम्यान श्री भैरेश्वर मंदिरावर, पालखीवर तसेच नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रातील श्री दत्त देवस्थान मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर यात्रेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून गुरुवार दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मानाचे सहा सवाल काढण्यात येणार असल्याची माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष प्रमोद उदगावे यांनी दिली.शिरोळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपाध्यक्ष शिवम लंबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी माजी सरपंच राहुल सूर्यवंशी म्हणाले की,शिरटी गावचे ऐतिहासिक व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री भैरेश्वर मंदिरासह नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रातील श्री दत्त देवस्थान मंदिरावर यात्रेदिवशी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे यात्रेला विशेष आकर्षण लाभणार असून भाविकांसाठी हा अनोखा अनुभव ठरणार आहे.गेल्या सुमारे १२ वर्षांपासून ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उभारून श्री भैरेश्वर मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम,कलशारोहण व सुशोभिकरणाची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर होत असलेली ही पहिलीच यात्रा असल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या यात्रेला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.गुरुवार दि. १२ मार्च रोजी होणाऱ्या सवाल कार्यक्रमात मानाचे सहा सवाल काढण्यात येणार आहेत.यामध्ये सौधर्म यजमान, धनपती कुबेर, ईशान्य इंद्र,कल्पेंद्र,कामदेव आणि इंद्रध्वज असे सवाल असणार आहेत. या सवाल कार्यक्रमात गावकरी, भाविक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री भैरेश्वर बांधकाम, कलशारोहण, सुशोभिकरण व युवक यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष शिवम लंबे, माजी सरपंच राहूल सूर्यवंशी, प्रगतशील शेतकरी अशोक चौगुले, अनिल रोजे, धनाजी भोसले, प्रकाश गंगधर, प्रशांत पाटील, निखिल पाटील, कुलदीपक बनीजवाडे, सागर पवार, पिंटू गुरव, राजकुमार शिरगावे, संदीप चौगुले, रविराज पाटील, अभिनंदन पाटील, अक्षय बने, जितेश पाटील , अमोल उदगावे, सुरज मुलानी, रोहन ढेकळे, प्रतीक बने, निशांत बने, शीतल पाटील आदी उपस्थित होते. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी प्रदक्षिणा व भाविकांसाठी विशेष आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.