विदेशी दारू व स्कॉर्पिओसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त ; शिये ते भुयेवाडी रस्त्यावर पोलिसांची कारवाई 

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

विना परवाना स्कॉर्पिओ गाडी मधून शिये – भुये रस्त्यावर होणारी विदेशी दारूची वाहतूक पोलिसांनी उघडकीस आणली. गाडीसह सुमारे साडेआठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी शशांक शामराव कारंडे (वय ३६, रा. गुरुवार पेठ, मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे. कारंडे कोणत्याही परवान्याशिवाय या दारूची वाहतूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ता. २ रात्री पावणे आठच्या सुमारास शिये ते भुयेवाडी रोडवर ‘संजना किराणा स्टोअर्स’समोर सापळा लावला होता. यावेळी महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ( क्र. एमएच ०९ एझेड ५००० ) गाडी आली. पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली. त्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. यामध्ये ट्युबर्ग बिअर, मॅकडॉवेल नंबर १, ओल्ड मंक, डर्बी स्पेशल व्हिस्की, गोवा जिन, ब्रँडी अशा विविध कंपन्यांच्या एकूण आठराशे अशठ्याहत्तर ( १,८७८ ) हून अधिक बाटल्या व टीन असा सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार नऊशे तीस ( ३,४५,९३०) रुपये किंमतीचा दरुसाठा व ५ लाख रुपये किमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी जप्त केली.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चौरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!