यड्राव / प्रतिनिधी
पार्वती औद्योगिक वसाहतीमधून विविध औद्योगिक प्रक्रियांमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी ओढ्याद्वारे नदीत मिसळत असल्याच्या गंभीर तक्रारीनंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर घटनास्थळी पाहणी केली.सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष तपासणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.पाहणीदरम्यान बालिघाटे यांनी औद्योगिक सांडपाण्यामुळे परिसरातील ओढे-नाले, शेती आणि विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होत असल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यांनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारत या प्रदूषणाकडे दुर्लक्ष का केले जात आहे,असा सवाल उपस्थित केला.यानंतर क्षेत्र अधिकारी पाटील यांनी परिसरातील ओढे-नाले तसेच दूषित पाणी येणाऱ्या विविध स्त्रोतांची तपासणी केली.या वेळी ओढ्यातील पाण्याचे तसेच सांडपाण्यामुळे प्रभावित झालेल्या विहिरीतील पाण्याचे नमुने अधिकाऱ्यांनी गोळा केले. काही शेतांमध्ये रासायनिक सांडपाणी गेल्यामुळे जमिनीवर रसायनांचा थर साचलेला आढळून आल्याने परिस्थितीची गंभीरता स्पष्ट झाली. या प्रदूषणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.दरम्यान, संबंधित शेतमालक आणि विहीर मालकांनी प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. “दरवेळी पाण्याचे नमुने घेऊन जाता, पण पुढे काहीच होत नाही.मग नमुने घेताच कशाला?” असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. या प्रकारामुळे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास ढासळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.घडलेल्या प्रकाराची नोंद घेण्यात आली असून घेतलेल्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण करण्यात येणार आहे. अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल,असे आश्वासन क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी दिले.मात्र,औद्योगिक सांडपाण्यामुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर गंभीर परिणाम होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करून दोषींना जबाबदार धरण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.