कनवाड-म्हैशाळ बंधाऱ्यामुळे बाधित शेतकऱ्यांचा संताप; मोबदला न मिळाल्याने धरणाचे काम बंद

Spread the love

कनवाड / प्रतिनिधी

कनवाड-म्हैशाळबंधाऱ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा तसेच भूसंपादनाचा मोबदला अद्याप न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धरणाच्या साईटवर सुरू असलेले काम बंद पाडत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रश्नावर सोमवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.कनवाड परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बंधाऱ्याच्या कामामुळे वाहून गेल्या आहेत.या नुकसानीचे पंचनामे होऊन तब्बल आठ महिने उलटले, मात्र अद्यापही संबंधित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला मिळालेला नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर प्रत्यक्ष धरणाचे बांधकाम होणार आहे, त्या शेतकऱ्यांनाही भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.या संदर्भात सुमारे महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी काम बंद पाडल्यानंतर शिरोळ तालुक्याचे आमदार यड्रावकर यांच्या कार्यालयात बैठक झाली होती. त्या वेळी एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तोपर्यंत वाहून जाणाऱ्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक बांध घालण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून कामास तात्पुरती परवानगी दिली होती.मात्र प्रत्यक्षात संरक्षक बांधाचे काम बाजूला ठेवून धरणाचे मुख्य बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाला केराची टोपली दाखवत कनवाड हद्दीत धरणाचे काम सुरू असल्याचे लक्षात येताच गुरुवारी सायंकाळी संतप्त शेतकरी थेट धरणाच्या साईटवर पोहोचले.त्यांनी सुरू असलेले काम तात्काळ बंद पाडत सर्व जेसीबी, पोकलेन मशीन आणि डंपर बाहेर काढून म्हैशाळकडे परत पाठवले.दरम्यान, शुक्रवारी पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी तो हाणून पाडला. परिस्थिती तणावपूर्ण होताच पाटबंधारे विभागाने शिरोळ पोलिसांना घटनास्थळी बोलावले.पोलिसांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी मध्यस्थी करत सोमवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.मात्र जमिनीच्या मोबदल्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत धरणाचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, मुस्तफा इनामदार, पोपट राणे, संभा माने, वाजिदअली इनामदार, संभाजी जाधव, इरफान इनामदार, कृष्णा देशमुख, तय्यब इनामदार, रियाज इनामदार, लक्ष्मण भोसले, सत्तार पटेल, राहुल माने, पप्पू इनामदार, दादासो खाडे, नबी पटेल आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!