१३ वर्षीय प्रिन्स सुनील पाटीलची उल्लेखनीय कामगिरी : १७ हजारांहून अधिक शब्दांचा हस्तलिखित शब्दकोश तयार

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या मास्टर प्रिन्स सुनील पाटील (वय १३) याने अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत १७ हजार ७५० पेक्षा अधिक इंग्रजी शब्दांचा हस्तलिखित शब्दकोश तयार करून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी साधली आहे. इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शब्दसंग्रह एकत्र करून त्याचा शब्दकोश तयार करणारा तो भारतातील सर्वात लहान विद्यार्थी ठरला आहे.प्रिन्सने तयार केलेल्या या शब्दकोशात इंग्रजी शब्दांचे इंग्रजीत अर्थ देण्यात आले असून सर्व शब्दांची वर्णानुक्रमाने मांडणी करण्यात आली आहे. संपूर्ण शब्दकोश अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि स्पष्ट हस्ताक्षरात लिहिलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शब्दसंग्रह संकलित करून त्याची शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब मानली जात आहे.या उल्लेखनीय कार्यासाठी त्याला शाळेच्या प्राचार्या सौ. स्मिता शिवगोंडा पाटील तसेच वर्गशिक्षक प्रीतम बाळासो हासुरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रिन्सने ही मोठी कामगिरी अल्पावधीत पूर्ण केली.प्रिन्स सुनील पाटील याच्या या विशेष कामगिरीची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्याची नोंद ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्डस्’ तसेच ‘ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे त्याला ‘India’s Youngest Lexicographer’ म्हणजेच ‘भारताचा सर्वात लहान शब्दकोशकार’ तसेच ‘Youngest Male Author’ हा मानाचा किताब मिळाला आहे. त्याचा हा विक्रम ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्डस्’च्या २०२७ च्या आवृत्तीत प्रकाशित होणार आहे.विशेष म्हणजे प्रिन्सने यापूर्वीही अनेक पुस्तकांचे संपादन व लेखन केले असून त्याची पुस्तके ई-बुक तसेच छापील स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याने तयार केलेला हस्तलिखित शब्दकोश लवकरच जयसिंगपूर येथील कवितासागर पब्लिशिंग एजन्सीमार्फत अधिकृत ISBN क्रमांकासह प्रकाशित होणार आहे. तसेच हा शब्दकोश गुगल बुक्सवरही उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.प्रिन्सची ही अभिमानास्पद कामगिरी जयप्रभा शिक्षण संकुल, जयसिंगपूर तसेच संपूर्ण परिसरासाठी गौरवास्पद ठरली असून विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल शाळेच्या वतीने प्रिन्सचा सत्कार करून त्याचे अभिनंदन करण्यात आले.त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!