पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (एनएच-४) या अत्यंत वर्दळीच्या महामार्गावर असलेल्या पुलाची शिरोली सांगली फाटा परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर येथे १०३३ क्रमांकाची ॲम्ब्युलन्स कायमस्वरूपी तैनात करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. अपघातानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यात होणारा विलंब अनेकदा जीवितहानीस कारणीभूत ठरत असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पुलाची शिरोली सांगली फाटा हा औद्योगिक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे मार्बल मार्केट तसेच व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. परिसरात अनेक उद्योगसंस्था, गोदामे तसेच व्यावसायिक आस्थापने कार्यरत आहेत. त्यामुळे येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर जड वाहने, कंटेनर, ट्रक, बस , फोर व्हीलर आणि दुचाकींची वर्दळ असते. सकाळी आणि सायंकाळी तर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. वाढती वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन, अपुरी सिग्नल व्यवस्था आणि काही ठिकाणी रस्त्यांची अपुरी रुंदी यामुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.अनेक अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी जखमी होत असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यास विलंब होतो. ‘गोल्डन अवर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या तासात योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. मात्र सध्या ॲम्ब्युलन्स दूरवरून बोलवावी लागत असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागतो. वाहतूक कोंडीमुळेही रुग्णवाहिका अडकून पडते, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाची शिरोली सांगली फाटा येथे १०३३ क्रमांकाची ॲम्ब्युलन्स कायमस्वरूपी तैनात केल्यास अपघातग्रस्तांना त्वरित प्राथमिक उपचार देऊन जवळच्या रुग्णालयात हलविणे शक्य होईल. त्यामुळे गंभीर जखमींचे प्राण वाचण्यास मोठी मदत होईल. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, अपघातानंतर अनेकदा नागरिकच स्वतःच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात घेऊन जातात, जे धोकादायक ठरू शकते. प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचारी आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांसह ॲम्ब्युलन्स उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.याशिवाय अपघात रोखण्यासाठीही काही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुलाची शिरोली सांगली फाटा परिसरात वेगमर्यादा काटेकोरपणे लागू करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सिग्नल यंत्रणा सुधारणा, झेब्रा क्रॉसिंग आणि स्पीड ब्रेकरची योग्य उभारणी करणे, तसेच वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. रस्त्यावरील दिशादर्शक फलक स्पष्ट आणि प्रकाशमान असावेत, अशीही सूचना करण्यात आली आहे.स्थानिक सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे प्रशासनाला आवाहन केले आहे. काही नागरिकांनी लेखी निवेदन देण्याची तयारी दर्शविली असून, आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.दरम्यान, प्रशासनाने या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिरोली फाटा येथे १०३३ क्रमांकाची ॲम्ब्युलन्स कायमस्वरूपी उपलब्ध झाल्यास अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळून जीवितहानी टाळण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.