पेठवडगाव शहरासाठी बाह्यवळण रस्त्याच्या मागणीसाठी आ.अशोकराव माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

हातकणंगले – पेठवडगाव मार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पेठवडगाव शहराला बाह्यवळण रस्ता (बायपास) करण्याची मागणी पुढे आली आहे. यासंदर्भात हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे लक्ष वेधले.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.पेठवडगाव शहरातून जाणाऱ्या हातकणंगले – पेठवडगाव मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. विशेषतः मालवाहतूक,ऊस वाहतूक, तसेच औद्योगिक आणि स्थानिक वाहनांमुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.त्यामुळे नागरिक,व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. अशोकराव माने यांनी पेठवडगाव शहराबाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता तयार केल्यास शहरातील वाहतूक सुरळीत होईल, तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद केले आहे. बाह्यवळण रस्त्यामुळे जड वाहतूक शहराबाहेरून वळवता येईल आणि शहरातील दैनंदिन वाहतूक अधिक सुरक्षित व सोयीस्कर होईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत संबंधित विभागामार्फत प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार डॉ.अशोकराव माने यांनी दिली.या प्रकल्पामुळे पेठवडगाव शहराचा वाहतूक प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, लवकरात लवकर बाह्यवळण रस्त्याचा निर्णय होऊन शहराच्या विकासाला नवे बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!