इचलकरंजीत महासत्ता चौकात गोळीबार; युवक गंभीर जखमी,फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलित 

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी 

इचलकरंजी शहरातील महासत्ता चौक परिसरात बुधवारी (दि. ४ मार्च) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.या घटनेत ओमकार कांबळे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे ओमकार कांबळे व सूर्यवंशी नामक युवक यांच्यात किरकोळ कारणावरून मारामारी झाली होती.या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले होते.ओमकार कांबळे यांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.काही दिवसांपूर्वी ते जामिनावर मुक्त झाले होते.दरम्यान,प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी जयसिंगपूर पोलिसांनी त्यांना इचलकरंजी येथे आणले होते.संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते परत जात असताना महासत्ता चौक परिसरातील सांगली – इचलकरंजी मार्गावरील एका रुग्णालयाजवळ ओमकार कांबळे व त्यांचा मित्र थांबले असता सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी ओमकार यांच्या पोटात लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच धावपळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओमकार यांना त्यांच्या मित्रांनी व तेथे उपस्थित पोलिसांनी तातडीने इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल केले.प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विक्रमसिंह गायकवाड व पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलित केले.या गोळीबारामुळे इचलकरंजी शहरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना पूर्वीच्या वादातून घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात उशिरा रात्रीपर्यंत करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!