अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; घातपात की अपघात? शिरोळ पोलिसांचा तपास सुरू

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ येथील दसरा चौक परिसरातील नगरपालिकेच्या कचरा विलिनीकरण शेडमध्ये सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना आज बुधवार (दि. ४ मार्च) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,शिरोळ येथल दसरा चौक परिसरात शहरातील कचरा एकत्र करून त्याचे विलनीकरण करून खत निर्मिती करण्यासाठी बांधण्यात आलेल्या शेडमध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला आहे.या शेडमध्ये अजून काम सुरू नसल्याने या ठिकाणी कोणीही कर्मचारी येत नसतात आजकाही कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी येत असल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता एका इसमाचा मृतदेह आढळून आला.याबाबतची माहिती शिरोळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी शिरोळ पोलिस दाखल झाले असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम तपास सुरू केले आहे.दरम्यान मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने हा मृत्यू अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा,असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, मृत इसमाच्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे डोक्यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा,अशी शक्यता वर्तवली जात आहे.मात्र हा मृत्यू अपघाती स्वरूपाचा आहे की घातपाताचा, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठविण्यात आला आहे.संबंधित इसमाची ओळख पटविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून परिसरातील तपासणी तसेच नागरिकांकडून माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे.या घटनेमुळे दसरा चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.शिरोळ पोलिसांकडून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व अंगांनी तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!