पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागाव (ता. हातकणंगले) येथील वडाचा मळा परिसरात गुरुवारी भरदुपारी झालेल्या भीषण हाणामारी प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.या गुन्ह्यातील मुख्य संशयितांना अटक करून शुक्रवारी पेठवडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने कोठडी सुनावलेल्या संशयितांमध्ये महादेव बाबुराव चौगुले (वय ४१), राजेंद्र बाबुराव चौगुले (वय ५५), सुधीर धोंडीराम चौगुले (वय ४१), सुभाष बापू चौगुले (वय ६०), संजय ज्ञानू चौगुले (वय ५७), सुकुमार धोंडीराम चौगुले (वय ४७) (सर्व रा. नागाव), गणेश सागर माळी (रा. कसबा सांगाव), योगेश संजय माळी (रा. गोकुळ शिरगाव), दर्शन चौगुले, शुभम चौगुले, प्रसन्न चौगुले, सरिता चौगुले, राणी चौगुले, सुनीता चौगुले, आशा चौगुले, रुपाली चौगुले आणि समृद्धी चौगुले यांचा समावेश आहे.गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नागाव येथील गणेश पाणी पुरवठा केंद्रासमोर ही घटना घडली. याप्रकरणी सौ. दिपाली सुधाकर ऐतवडे (वय ४०, रा. पाटील गल्ली, नागाव) यांनी फिर्याद दिली आहे. शेत जमिनीच्या वादातून ही मारामारी झाली आहे. यामध्ये हत्यारांचा वापर झाला आहे. शिवाय सोन्याचे दागिने व मोबाईल चोरीस गेले आहेत. याशिवाय, बाहेरगावाहून बोलावलेले २० ते २५ भाडोत्री मारेकरी अद्याप बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.अशा विविध कारणांसाठी पोलीसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उप विभागीय अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी कारवाईदरम्यान गुन्ह्यात वापरलेली आणि हत्यारे ठेवलेली एक मोटार, तसेच अन्य दोन अशा एकूण तीन मोटारी ताब्यात घेतल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
जखमींची प्रकृती स्थिर
या हल्ल्यात सुधाकर ऐतवडे, हर्ष ऐतवडे, अभिषेक सूर्यवंशी, पार्थ जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.