कुरुंदवाडच्या विकासात जयरामबापूंचे हिमालयाएवढे योगदान – आमदार सतेज पाटील

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी 

कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयरामबापू पाटील यांच्या दुःखद निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.आज आमदार सतेज पाटील (बंटी पाटील) यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन जयरामबापूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी त्यांनी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला.जयरामबापूंशी असलेले आपले नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते, अशा भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केल्या. शिवाजी विद्यापीठ स्टुडंट कौन्सिल आणि NSUIच्या विद्यार्थी चळवळीपासून आमची मैत्री दृढ होत गेली. संघर्षाच्या काळात त्यांनी नेहमीच मार्गदर्शक आणि आधारवडाची भूमिका बजावली,असे त्यांनी सांगितले. गोरगरिबांप्रती असलेली जयरामबापूंची आत्मीयता आणि समाजकारणातील त्यांची निष्ठा ही प्रेरणादायी होती. कुरुंदवाडच्या विकासात त्यांचे योगदान हिमालयाएवढे भक्कम आहे. शहराच्या पायाभूत सुविधा,सामाजिक उपक्रम आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवे आयुष्य मिळाले, असेही आमदार पाटील यांनी नमूद केले. जयरामबापूंच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.त्यांच्या समाजकार्याची परंपरा आपण सर्वांनी मिळून पुढे नेली पाहिजे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी विजय जयराम पाटील, सागर जयराम पाटील,शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, दादासो पाटील, दिपक परीट, महावीर पाटील, प्रदीप चव्हाण, विनायक घोरपडे, आनंदा पवार, गोपाळ चव्हाण, एन. डी. पाटील, दिपक पाटील, नाना बोटे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!