शिवरायांचे नेतृत्व,दूरदृष्टी,संघटनकौशल्य आणि शौर्य हे आजच्या पिढीसाठी दिशादर्शक – प्रसिद्ध व्याख्याते उदय मोरे 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील शिवशक्ती मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे जीवनकार्य’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.इतिहास अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते उदय मोरे यांनी आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून उपस्थितांना छत्रपती शिवरायांच्या कार्याचा प्रेरणादायी परिचय करून दिला.प्रारंभी नगरसेवक सचिन शिंदे यांनी स्वागत करून मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील उपक्रमांची माहिती दिली.गेली पन्नास वर्षे शिवशक्ती मंडळाने सामाजिक सलोखा,बंधुभाव आणि परिवर्तनाच्या चळवळीतून समाजहित जपले असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी वर्षभरात विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत उदय मोरे म्हणाले की, शिवरायांनी जनतेचे हित आणि देशाची सुरक्षा यांना सर्वस्व मानले. स्वराज्य ही संकल्पना लोककल्याणाशी जोडलेली होती. शिवरायांच्या जन्मतारीख आणि कार्याबाबत काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींकडून इतिहासाची मोडतोड करण्याचे प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही प्रवृत्ती वेळीच थोपविणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.शिवरायांनी तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ती साकार करण्याची प्रेरणा दिली.त्यांचा धगधगता इतिहास जाणून घेत युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत, कठोर परिश्रम करावेत आणि स्वराज्याची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी,असे आवाहन त्यांनी केले.शिवरायांचे नेतृत्व,दूरदृष्टी, संघटनकौशल्य आणि शौर्य हे आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास माजी उपसभापती संजय माने,नगरसेवक ओंकार गावडे,अनुराधा गुरव,श्रीकांत जगदाळे,महीपती बाबर,पुंडलिक शिंदे,सर्जेराव माने,आप्पालाल चिकोडे, डॉ.दगडू माने,मनिषा कुंभार,संजय माने, पांडुरंग उर्फ अविनाश माने,बाबासो नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.अंकुश माने यांनी आभार मानले.शिवशक्ती मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून समाजात इतिहासाबद्दल अभिमान,ऐक्य आणि सकारात्मक विचारांची नवी ऊर्जा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!