शिरोळ नगरपालिकेची शुक्रवारी अर्थसंकल्पीय सभा,आघाडीचा पहिलाच अर्थसंकल्प जाहीर होणार

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपालिकेची आज दुपारी १२ वाजता अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत सन 2025-26 चे सुधारित तसेच 2026-27 चे नवीन अर्थसंकल्प मंजूर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.नगरपालिकेत नुकत्याच सत्ता बदल झाल्यानंतर यादव आघाडीची सत्ता स्थापन झाली असून,हा आघाडीचा पहिलाच अर्थसंकल्प जाहीर होणार आहे.सभेचे आयोजन पालिकेच्या कै.दिनकररावजी यादव सभागृहात केले आहे.यावेळी विविध विभागातील निधीवितरण, विकासकामे आणि अन्य महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होईल.या अर्थसंकल्पात शहरातील वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्षभरात किती प्रमाणात निधी खर्च केला जाणार आहे याची सविस्तर माहिती उपस्थित सदस्यांना दिली जाणार आहे.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळा उभारणीसंदर्भात विशेष चर्चाही होणार आहे.तसेच,सर्व धर्मीय दफन व दहन विधीसाठी नफा फंडातून अनुदान देण्याचे प्रस्तावही सभेत मांडले जाणार आहेत.नगरपालिकेच्या दसरा चौक येथील कचऱ्याची विल्हेवाट लावणे यासाठी जेसीबी व डंपर खरेदीसाठी निविदा काढण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.याशिवाय,कचऱ्याचे बायोमायनिक रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेवरही चर्चा होणार आहे,ज्यामुळे परिसरातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्वपूर्ण पावले उचलली जातील.सभेत सर्व विभागाच्या वार्षिक निविदा,मनुष्यबळ सेवा पुरवठा,तसेच विविध योजनांसाठी वित्तीय मंजुरी देण्यासंबंधी निर्णय घेण्यात येतील. नगरपालिकेचे प्रशासन म्हणते की,हा अर्थसंकल्प शिरोळ शहराच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी व शहरातील विकासासाठी दिशादर्शक ठरेल.शहरातील नागरिक आणि माध्यमांसाठी ही सभा महत्त्वाची ठरली असून,यामुळे आगामी वर्षातील नगरपालिकेच्या कामकाजाची दिशा निश्चित होईल.यादव आघाडीच्या नव्या नेतृत्वाखाली हा अर्थसंकल्प शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी एक ठोस मार्गदर्शक ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!