जयसिंगपूर / प्रतिनिधी
समाजवादी विचारवंत व प्रबोधन चळवळीतील ज्येष्ठ नेते आचार्य शांताराम गरुड हे “प्रबोधकांचे प्रबोधक” होते, असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी केले. समाजवादी प्रबोधिनीच्या जयसिंगपूर शाखेच्या वतीने आचार्य शांताराम गरुड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित “आचार्य शांताराम गरुड व्यक्ती आणि कार्य” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.चिदानंद आवळेकर होते.कुलकर्णी म्हणाले, भारतीय संस्कृतीपासून भारतीय राज्यघटनेपर्यंत, मार्क्सवादापासून गांधीवादापर्यंत तसेच भारतीय दर्शनपरंपरेपासून लोकशाही समाजवादापर्यंत विविध विषयांचे समकालीन संदर्भात तौलनिक व प्रबोधनात्मक विवेचन करण्याचे कार्य आचार्य गरुड यांनी आयुष्यभर केले. भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान हा विषय संस्थात्मक प्रबोधनाच्या अग्रभागी पन्नास वर्षांपूर्वी आणणारे ते द्रष्टे विचारवंत होते. पुरोगामी, परिवर्तनवादी व प्रबोधन चळवळीतील कार्यकर्त्यांनी विवेकनिष्ठ व विचारनिष्ठ भूमिका कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.शांताराम बापूंच्या निधनाला पंधरा वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्राच्या समाजकारण, राजकारण व विचारविश्वात त्यांनी तब्बल सात दशके सक्रिय योगदान दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली. साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातली मार्मिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. डॉ. एन. डी. पाटील, शहीद गोविंद पानसरे यांच्यासह सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी ११ मे १९७७ रोजी शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची स्थापना केली. सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेली ही संस्था आता पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.जन्मशताब्दी वर्ष व प्रबोधिनीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना सर्व समाजघटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. आवळेकर यांनी शांताराम बापूंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत समाजवादी प्रबोधिनीचे कार्य अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. प्रबोधिनीची साप्ताहिक बैठक दर मंगळवारी सायंकाळी सात वाजता डॉ. आवळेकर हॉस्पिटलच्या टेरेस सभागृहात होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमास प्रा. शांताराम कांबळे, प्रा. यशवंत चव्हाण, अमोल वडर, बापू ढोले आदी उपस्थित होते.