पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागाव ता.हातकणंगले येथील वड्याचा मळा येथे जमिनीच्या वादातून हातात तलवार, काठ्या, लोखंडी रॉड आणि इतर घातक शस्त्रे घेऊ प्राणघातक हल्ला झाल्याने ९ जण जखमी झाल्याची घटना घडली.यामध्ये दिपाली सुधाकर ऐतवडे , सुधाकर आनंदराव ऐतवडे, हर्ष प्रभाकर ऐतवडे, अभिषेक महेश सुर्यवंशी, अंकुश दत्तु गुडाळे, हर्षचा मित्र पार्थ जाधव सिंधुताई आनंदराव ऐतवडे, साधना प्रभाकर ऐतवडे, सुनिल यशवंत ऐतवडे सर्व रा. नागांव हे जखमी झाले त्यांच्यावर कोल्हापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.हि घटना वड्याचा मळा नागाव येथे दुपारी तीनच्या सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,प्रभाकर ऐतवडे व राजेंद्र चौगुले व महादेव चौगुले यांचा शेतजमिनीतील वहिवाटीच्या रस्त्यावरून बरीच वर्षे वाद सुरू आहे. महसूल विभागाच्या कागदोपत्री नोंदीवरुन हा रस्ता प्रभाकर व सुधाकर ऐतवडे यांच्या मालकीचा असून तशी सातबारा पत्रकी नोंद आहे.असे पुरावे हा रस्ता बंद करण्यासाठी ऐतवडे यांनी रीतसर महसूल विभागाची सर्व कागदपत्रे शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे दाखल केली होती. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दोन्ही बाजूकडील लोकांना एकत्र बोलवून नोटीस दिली होती.व चौगुले यांना ऐतवडे यांना त्यांच्या कामात विरोध न करण्याची नोटीस लागू करण्यात आली होती. तसेच तुम्हाला याबाबत कांही तक्रार असल्यास दिवाणी न्यायालयात जावू शकता असे पोलिसांनी सांगितले होते.असे सांगून दोन्ही गटातील लोकांना घालवले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी प्रभाकर ऐतवडे हे आपल्या हद्दीनुसार कंपाउंड घालत होते. दरम्यान चौगुले यांनी कसबा सांगाव गोकुळ शिरगाव व अन्य गावातील आपले नातेवाईक सदर ठिकाणी बोलावून घेतले होते.सदर ठिकाणी ३० ते ३५ नातेवाईक घटनास्थळी चार ते पाच कार गाड्यांमधून आले होते. यावेळी जोरदार वादावादी होऊन चौगुले व त्यांच्या बाहेरुन आलेल्या तरुणांनी तलवारी, जंबिया, कोयते,फायटर ,हॉकी स्टिक,काठ्या अशा प्राणघातक हत्यारांनी प्रभाकर ऐतवडे व त्यांच्या घरच्या मंडळीवर प्राण घातक हल्ला केला.यामध्ये सुधाकर आनंदराव ऐतवडे यांचे दोन ते तीन नातेवाईक गंभीर जखमी झाले असून पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदरची घटना समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कर्मचाऱ्यांसह फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलीस आल्याचे पाहताच हल्लेखोरांनी उसाच्या शेतातून रत्नागिरी नागपूर हायवे च्या दिशेने पळ काढला.घटनास्थळी हत्यारांचा खच पडला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.आरोपींनी हातात तलवार, काठ्या, लोखंडी रॉड आणि इतर घातक शस्त्रे घेऊन फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या साक्षीदारांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दिपाली ऐतवडे यांच्यासह सुधाकर ऐतवडे, हर्ष ऐतवडे, अभिषेक सूर्यवंशी आणि इतर एकूण ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.या मारहाणीत आरोपींनी फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (मंगळसूत्र,बोरमाळ, गंठण, चैन) आणि आयफोन असा मौल्यवान ऐवज जबरदस्तीने काढून घेतल्यात आले आहे. तसेच शेतातील गहू पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले .याप्रकरणी शिरोली पोलिसांनी आरोपी महादेव बाबुराव चौगुले वय ४१, राजेंद्र बाबुराव चौगुले वय ५५, सुधिर धोंडीराम चौगुले वय ४१, सुभाष बापु चौगुले वय ६०, संजय ज्ञानु चौगुले वय ५७, सुकुमार धोंडीराम चौगुले व. व. ४७ सर्व रा. नागांव ता. हातकणंगले , गणेश सागर माळी व. व. २१ रा. कसबा सांगाव ता.कागल, , योगेश संजय माळी व. व. २६ रा. गोकुळ शिरगांव ता. करवीर , दर्शन चौगुले, शुभम चौगुले, प्रसन्न चौगुले, सरिता राजेंद्र चौगुले, राणी महादेव चौगुले, सुनिता संजय चौगुले, आशा सुभाष चौगुले, रुपाली सुकुमार चौगुले, समृध्दी सुधीर चौगुले, याना ताब्यात घेवून इतर आरोपीचे पाहुणे व मित्र पुरुष २० ते २५ असून अन्य फरार आरोपींना शोधण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .