ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांना नामदेव भोसले स्मृती पुरस्कार जाहीर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक सुनील इनामदार यांना यंदाचा नामदेव भोसले स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.त्यांच्या प्रदीर्घ आणि अभ्यासू पत्रकारितेच्या प्रवासाची ही योग्य दखल मानली जात असून, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक विषयांवरील त्यांच्या लेखनाने वाचकांमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.१ मार्च २०२६ रोजी मिरज येथे आयोजित नामदेव चैतन्य साहित्य संमेलनात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ.मोहन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.या सोहळ्यास सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाच्या उपायुक्त स्मृती पाटील,डॉ.रियाज मुजावर तसेच डॉ.विनोद परमशेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे हा सोहळा साहित्यप्रेमींसाठी विशेष ठरणार आहे.पत्रकार सुनील इनामदार यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक बदल, शिक्षण, संस्कृती आणि मानवी मूल्ये यांचा सातत्याने ऊहापोह केला आहे.त्यांच्या परखड शैलीमुळे आणि वस्तुनिष्ठ मांडणीमुळे वाचकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.पत्रकारितेबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून अनेक तरुण पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.त्यांच्या या गौरवामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना नवी ऊर्जा मिळणार असून, हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा सन्मान तर आहेच; शिवाय सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा गौरवही आहे. इनामदार यांचे राजकीय,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!