मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे स्वाभिमानीचे शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांचे शाळा व हायस्कूल यांना निवेदन 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 गेल्या काही महिन्यांपासून शालेय मुली तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचार व छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे.या पार्श्वभूमीवर शिरोळ शहरातील सर्व शाळा व हायस्कूलमध्ये मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांच्या वतीने शहरातील विविध शाळांना देण्यात आले.जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून, शिरोळमधील शाळा व हायस्कूलमध्ये आठवड्यातून एक दिवस घेतल्या जाणाऱ्या पी.टी.तासामध्ये मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शारीरिक शिक्षणाच्या तासात लाठी-काठी तसेच इतर साहसी प्रकारांद्वारे मुलींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात यावे,जेणेकरून अत्याचार किंवा छेडछाडीच्या प्रसंगी त्यांनी स्वतःचा बचाव करता येईल, असे संघटनेने नमूद केले आहे.पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शालेय जीवनापासूनच मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, धैर्य निर्माण करणे आणि संकटसमयी योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सचिन सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. सर्व शाळांनी हा उपक्रम गांभीर्याने राबवावा, यासाठी प्रशासनाकडे रीतसर लेखी पत्रव्यवहार करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.सदर निवेदन देताना माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे (पैलवान), प्रदीप चव्हाण, उत्तम माळी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माने,अनिल चव्हाण, तात्यासाहेब देशमुख, धीरज शिंदे, साजिद आत्तार, सागर पाटील, प्रशांत गंगधर, आशिष शेट्टी (कल्लू) तसेच विनायक जाधव आदी उपस्थित होते.दरम्यान, या उपक्रमाला शैक्षणिक संस्था व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!