अर्जुनवाड / प्रतिनिधी
अर्जुनवाड येथे आज ग्रामस्थांच्या संयमाचा अखेर बांध फुटला.प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे अधिकारी रोहिदास मातकर पाहणीसाठी आले असता संतप्त नागरिकांनी त्यांना कोंडून घालत कृष्णा नदी प्रदूषित करणाऱ्या उद्योगांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली.कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही,असा सज्जड इशारा देत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कृष्णा नदी आधीच प्रदूषणाच्या विळख्यात अडकत असताना, जयसिंगपूर येथील वसाहतीमधील विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याची तक्रार उदगाव,चिंचवाड, अर्जुनवाड व घालवाड येथील नागरिकांनी वारंवार मंडळाकडे केली होती.मात्र,या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करत नागरिकांनी संबंधित उद्योगांवर फौजदारी गुन्हे दाखल करून यंत्रणा सील करण्याची मागणी केली.आज पंचायत समिती सदस्य सौ.सीमा म्हैशाळे,आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे तसेच आजी-माजी सरपंच व सदस्य यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसह प्रदूषित भागाची पाहणी करण्यात आली.पाहणीत विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे दिसून आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला.आरोग्याशी खेळणाऱ्यांना संरक्षण आणि तक्रारदारांना प्रतीक्षा – ही दुटप्पी भूमिका थांबवा,असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. दरम्यान माजी आरोग्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघातच अधिकाऱ्यांना कोंडून धरण्याची वेळ येणे ही गंभीर बाब मानली जात आहे.आता आमदारांची भूमिका काय असणार,याकडे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघासह शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.दरम्यान,प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर तातडीने दंडात्मक व फौजदारी कारवाई,सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची सक्ती आणि नदीपात्राची वैज्ञानिक तपासणी यांसह ठोस कृती आराखडा जाहीर न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.“कृष्णा नदी वाचवा, जीवन वाचवा”चा नारा देत अर्जुनवाडकरांनी आज प्रशासनाला जागे केले आहे.प्रदूषण घटकावर कारवाई न झाल्यास पुढील काळात आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.