पुलाची शिरोली येथील श्री काशिलिंग बिरदेव मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला श्री समर्थांचा अखंड सामूहिक नामस्मरण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. परिसरातील तसेच पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सोहळ्यादरम्यान “श्री स्वामी समर्थ” या नामाचा अखंड घोष मंदिर परिसरात घुमत होता. स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणाने वातावरण पूर्णतः भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी श्री काशिलिंग बिरदेव यांच्या मंगल आरतीने करण्यात आली.त्यानंतर सामूहिक नामजपाला प्रारंभ झाला. नामस्मरणात सहभागी झालेल्या भाविकांनी अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने जप करत संपूर्ण वातावरण पवित्र केले. महिला मंडळ, युवक मंडळ तसेच ग्रामस्थांनी सोहळ्याच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला होता. सायंकाळी धुपारती आणि सामूहिक आरतीने वातावरण अधिकच भारावून गेले. “जय जय स्वामी समर्थ” या घोषणांनी भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला होता.सोहळ्यादरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांनी आपल्या मनोकामना व्यक्त करत स्वामी समर्थांच्या कृपेची प्रार्थना केली.आयोजकांनी सांगितले की, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हा अखंड नामस्मरण सोहळा यशस्वीरीत्या पार पडला असून पुढील वर्षी हा सोहळा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा मानस आहे. या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली असून भाविकांच्या मनात समाधान आणि शांततेची भावना निर्माण झाली आहे.स्वामी समर्थांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभो,अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.
पुलाची शिरोलीत श्री समर्थ अखंड नामस्मरण सोहळा भक्तिभावात संपन्न
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे