राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी दादासो पुजारी यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बातमी म्हणजे जय शिवराय क्रीडा मंडळ, पुलाची शिरोलीचा राष्ट्रीय कबड्डीपटू दादासो शिवाजी पुजारी यांची गुजरात येथे होणाऱ्या ७२ व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दादासो पुजारी यांनी यापूर्वीही राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवली आहे. त्यांनी खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि दमदार खेळाचे प्रदर्शन केले होते.त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला ब्रॉन्झ पदक पटकावण्यात मोलाचा वाटा उचलता आला.त्यांची जिद्द,चिकाटी आणि नेतृत्वगुण यामुळे ते संघासाठी कायमच विश्वासार्ह खेळाडू ठरले आहेत.विशेष म्हणजे तब्बल २२ वर्षांनंतर कोल्हापूर संघाने राज्य अजिंक्यपदावर नाव कोरण्याचा मान मिळवला तो दादासो पुजारी यांच्या नेतृत्वाखालीच. त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे संघामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि कोल्हापूरच्या कबड्डी इतिहासात सुवर्णपान लिहिले गेले.दादासो यांनी आजवर अनेक खेलो इंडिया स्पर्धा, राष्ट्रीय शालेय स्पर्धा तसेच राष्ट्रीय कुमार गट स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सध्या ते या प्रो कबड्डी लीगमधील नामांकित संघाचे प्रतिनिधित्व केलं असून व्यावसायिक पातळीवरही आपली छाप पाडत आहेत.त्यांच्या यशामागे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रा.संभाजी पाटील,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.रमेश भेंडेंगिरी, श्री.रघुनाथ पाटील, एन.आय.एस. प्रशिक्षक दीपक पाटील, आण्णासो गावडे (सर), तसेच जय शिवराय मंडळाचे अध्यक्ष बाळू पाटील व उत्तम गावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दादासो पुजारी यांच्या या यशामुळे कोल्हापूरच्या कबड्डी परंपरेला नवी उंची मिळाली असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही ते महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!