शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त विविध स्पर्धा,शर्यती व व्याख्यान असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.सार्वजनिक तरुण मंडळाकडून सामाजिक उपक्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.येथील विविध सेवाभावी संस्था,सार्वजनिक तरुण मंडळे,झेंडा चौक, राजेशिवाजी ग्रुप यासह शाळा, महाविद्यालय तसेच शिरोळ पंचायत समिती, पोलीस प्रशासन आदी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे,गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता कांबळे,नगरसेवक सचिन शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.श्री पद्माराजे विद्यालय शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.दरम्यान,शिरोळ पंचायत समिती कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज,लोकराजा शाहू महाराज,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.